अकोला: गर्भपाताच्या गोळ्यांची अवैधरीत्या विक्री करणारी महिला संध्या रमेश चांदेकर (४0 रा. चवरे प्लॉट) आणि गोळ्यांचा पुरवठादार संजय धनकुमार जैन (५0 रा. आळशी प्लॉट) याला गुरुवारी अटक केली होती. रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूख शेख (५२) यांनी गुरुवारी रात्री १0.३0 वाजताच्या दरम्यान दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे गर्भपाताच्या गोळ्यांची अवैधरीत्या आणि विनापरवाना विक्री करणाºया व्यक्तींविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मीना सिवाल, औषधे निरीक्षक हेमंत मेतकर, विधी समुपदेशक शुभांगी खांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने सापळा लावला. एका महिलेला बनावट ग्राहक बनवून गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारी संध्या चांदेकर हिला संपर्क साधला. संपर्क साधल्याने या महिलेने जेस्टाप्रो नामक गोळ्यांची मागणी केली असता, संध्या चांदेकरने तिला टॉवर चौकात बोलाविले आणि या ठिकाणी तिला ८६७ रुपये किमतीच्या गोळ्यांच्या दोन स्ट्रीप आणून दिल्या आणि त्यासाठी तिने चार हजार रुपये घेतले. या महिलेने दबा धरून बसलेल्या पथकाला इशारा करताच महिलेला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर संध्या चांदेकर हिला गोळ्यांचा पुरवठा करणारा संजय धनकुमार जैन याला फोन करण्यास सांगितले. तिने त्याला फोन करून गोळ्यांच्या आणखी दोन स्ट्रीप घेऊन बोलाविले. संजय जैन हा गोळ्या चवरे प्लॉटमध्ये आल्यावर पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून गोळ्यांसह दोन दुचाकी असा एकूण ७६ हजार ८६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नसी अॅक्ट १९७१ चे कलम ५ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय एस.एम. इथापे, हेकाँ राजेश इंगळे यांनी केली.जैन हा बी.फार्म शिक्षितअटक केलेला संजय जैन हा बीफार्म शिक्षित असून, यापूर्वी तो मेडिकल एजन्सीमध्ये कामाला होता. त्यामुळे औषधांची चांगली माहिती आहे. त्याच्याकडे गर्भपात करण्याच्या गोळ्या बाळगण्याचा व विक्री करण्याचा परवाना नसतानाही तो हैदराबाद, मध्य प्रदेशातून गर्भपाताच्या गोळ्या आणून अवैधरीत्या गरजू महिला, तरुणींना अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये त्याचा पुरवठा करायचा. यासाठी त्याला संध्या चांदेकर सहकार्य करायची.
आरोपी महिला घरात करायची गर्भपात?आरोपी संध्या चांदेकर ही यापूर्वी आरोग्य केंद्रात काम करायची. नंतर तिने हे काम सोडल्यानंतर तिने एका खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम सुरू केले. कुमारिका माता, महिलांना हेरून ती संजय जैन याच्यामार्फत त्यांना गर्भपाताच्या गोळ्या पुरवायची. तिच्या घरी सापडलेल्या साहित्यावरून तरुणी, महिलांना घरी बोलावून गर्भपात करायची, असा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करणार आहेत.आरोपींनी स्त्री भ्रूणहत्या केल्याची शक्यतास्त्री भ्रूणहत्या प्रतिबंधक कायद्यामुळे गर्भलिंग परीक्षणावर निर्बंध आल्यामुळे गर्भपात दवाखान्यात येत नाहीत. त्यामुळे या आरोपींनी असे रुग्ण हेरून गर्भपात करून स्त्री भ्रूणहत्या केल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचाही तपास पोलीस करणार आहेत.