लोहारा (अकोला) : येथील अवैध रेती साठ्यांवर बाळापूरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी धाड टाकून सदर रेतीसाठा जप्त करण्यात आला. यात १४ जणांचे रेतीसाठे जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात सुनावणी घेऊन अवैध रेतीसाठा आढळलेल्या पाच जणांचा १७ लाख ४१ हजार ६३० रुपये दंड आकारण्यात आला असून, या कारवाईने रेती चोरांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणातील नऊ जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे.१२ जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बाळापूर तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी आपल्या ताफ्यासह लोहारा येथील अवैध रेतीसाठ्यावर धाड टाकत १४ जणांचा २८७ ब्रास रेतीसाठा जप्त केला होता. यातील साठा मालकांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. यात नऊ साठा मालकांनी रेतीची रॉयल्टी सादर केली होती. सदर रॉयल्टी तपासासाठी बुलडाणा व अकोला खनिकर्म अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्या अभिप्रायानंतर या नऊ जणांवर कारवाई करण्यात येईल. तूर्तास ज्यांनी रॉयल्टी सादर केली नाही, अशा ग्रामस्थांना दंड ठोठाविण्यात आला आहे. यामध्ये वासुदेव हरिमकार ७ लाख ९१ हजार ६५० रुपये दंड, वसीम सलीम पटेल ३ लाख ९५ हजार ८२५ रुपये, फारूक पटेल यांना ७९ हजार १६५ रुपये दंड, याकुब मुसा देशमुख ७९ हजार १६५ रुपये दंड, असलम सलीम पटेल यांना ३ लाख ९५ हजार ८२५ रुपयेदंड तर एकूण पाच जणांना १७ लाख ४१ हजार ६३० रुपये दंड आकारण्यात आला. उर्वरित नऊ रेतीसाठा मालकांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. या कारवाईनंतरही रेती चोरी थांबली नाही. लोहारा नदीपात्रातील व जप्त केलेल्या रेतीसाठ्यावरील रेती चोरी सर्रास सुरू आहे. (वार्ताहर)