लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवैध सावकारीचा व्यवसाय करणारा आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी गौरव शर्मा याला रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अवैध सावकारांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात हा अवैध सावकार सहभागी झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी त्याला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले होते. दक्षता नगरातील कॉम्प्लेक्समध्ये गजानन ट्रेडिंग कंपनी चालविणारा गौरव अशोक शर्मा हा अवैध सावकारी व्यवसाय करतो. यासंदर्भात उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारीनुसार उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी जयंत श्रीराम सहारे त्यांनी तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीमध्ये गौरव हा अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्यांच्या तक्रारीनुसार गौरव शर्मा याच्यावर मंगळवारी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याने मंगेश देशमुख यांच्यासोबत दोन लाख रुपयांचा व्यवहार केला होता. अवैध सावकारांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात गौरव शर्मा सहभागी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यावर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी तातडीने गौरव शर्माला अटक करण्याचे रामदासपेठ पोलिसांना आदेश दिले. त्यामुळे रामदासपेठ पोलिसांनी त्याला अटक केली.
अवैध सावकार शर्मा याला अटक
By admin | Published: June 02, 2017 1:41 AM