अकोला: माना पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या कवठा सोपीनाथ येथे नागपंचमी यात्रेत धारदार चाकू, गुप्ती, लोखंडी कत्ते आणि कट्यार अशा घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या आरोपीस माना पोलिसांनी छापा घालून अटक केली. त्याच्याकडून असा एकूण ३९ शस्त्रांचा साठा हस्तगत केला. या प्रकरणात आर्म ॲक्ट अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कवठा सोपीनाथ येथे नागपंचमीच्या दिवशी यात्रा होती. या यात्रेत प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर दशरथ सिंग मुकुंद सिंग अंधरेले, रा.कारंजा, जिल्हा वाशिम हा घातक शस्त्र विकत असल्याची माहिती माना ठाणेदार सपोनि सुरज सुरोशे यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलिस पथकाला यात्रेकडे रवाना करून छापा घालून दशरथसिंग अंधरेले याला अटक केली. त्याच्याकडून १५ गुप्ती, ११ चाकू, ८ लोखंडी कत्ते आणि ५ धारदार कट्यार असे शस्त्रांचा साठा हस्तगत केला. त्याच्याविरूद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस कर्मचारी संदीप सरोदे, उमेश हरमकर, राजेश डोंगरे, जय मंडावरे, पंकज वाघमारे, आकाश काळे यांनी केली.