अकोला : शहरातील गुलजारपुरा भागात एका खासगी गोदामातून ४५ क्विंटल ४८ किलो धान्याचा अवैध साठा सोमवारी जप्त करण्यात आला. अकोला तहसील कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली.
अकोला शहरातील गुलजारपुरा भागात एका खासगी गोदामात धान्याची अवैध साठवणूक करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावरून अकोला तहसील कार्यालयाच्या पथकाने संबंधित खासगी गोदामात छापा टाकून गोदामात साठवणूक केलेल्या धान्यसाठ्याची कागदपत्र मागितली असता, कागदपत्रे देण्यात आली नाही. त्यामुळे खासगी गोदामात अवैधरीत्या साठवणूक करण्यात आलेला रेशनचा ४५ क्विंटल ४८ किलो अवैध धान्यसाठा पथकाने जप्त करून शासकीय धान्य गोदामात जमा केला. जप्त करण्यात आलेल्या अवैध धान्यसाठ्यात ४० क्विंटल गहू साठ्यासह तांदूळ, ज्वारी, मका व हरभरा, आदी धान्यसाठ्याचा समावेश आहे.
अन् साठेबाज गेला पळून !
गुलजारपुरा भागातील एका खासगी गोदामात अकोला तहसील कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून गोदामात अवैधरीत्या साठवणूक करण्यात आलेला धान्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान मात्र धान्याची अवैध साठवणूक करणारा संबंधित साठेबाज व्यक्ती पळून गेला. त्यामुळे धान्याची अवैध साठवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप निष्पन्न झाले नाही, असे अकोल्याचे तहसीलदार बळवंतराव अरखराव यांनी सांगितले.