लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी चर्चा न करताच शहरातील मालमत्ता करवाढीचा घेतलेला ठराव अवैध आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. अवाजवी करवाढीविरोधात भारिप-बमसं शहरात आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.मनपाच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरील मालमत्ता कर वाढीच्या विषयावर चर्चा न करताच ठराव मंजूर करण्यात आला. चर्चा न करता घेतलेला ठराव अवैध असल्याचे सांगत, शहरात ७० हजार मालमत्तांवर कर आकारण्यात येत असून, उर्वरित ३० हजारापेक्षा जास्त मालमतांवर कर आकारणी करण्यात आली नाही, असे त्यांनी सांगितले. कर किती टक्के वाढविण्यात आला, हे सत्ताधाऱ्यांनी आधी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी करून, महाशिक्षण कर लावण्याचा अधिकार मनपाला नाही, असे ते म्हणाले. करवाढ का आणि कशासाठी करण्यात आली, यासंबंधीची भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत शहरातील नागरिकांनी अतिरिक्त कर भरू नये, असे आवाहन करीत करवाढीविरोधात भारिप-बमसंच्यावतीने शहरात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. शहरातील ज्या मालमत्तांवर अद्याप कर आकारण्यात आला नाही, अशा मालमत्तांवर कर लावल्यास करवाढ करण्याची गरजच राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भारिप-बमसंच्या मनपा गटनेता अॅड. धनश्री अभ्यंकर (देव), नगरसेवक बबलू जगताप, नगरसेविका किरण बोराखडे, माजी नगरसेवक गजानन गवई, अरुंधती शिरसाट, आसीफ खान, डॉ. प्रसन्नजित गवई, बुद्धरत्न इंगोले उपस्थित होते. न्यायालयात जाणार!सर्वसाधारण सभेत चर्चा न करता करवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे करवाढीच्या निर्णयाविरोधात भारिप-बमसं न्यायालयात धाव घेणार असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.‘बॅलेट’द्वारे मतदान; अन्यथा निवडणूक होऊ देणार नाही!जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) ऐवजी मतपत्रिकांद्वारे (बॅलेट) मतदान घेण्यात यावे, अन्यथा निवडणूक होऊ देणार नाही, असा इशाराही अॅड. आंबेडकर यांनी यावेळी दिला.
चर्चेविना करवाढीचा ठराव अवैध!
By admin | Published: June 02, 2017 1:53 AM