अकोला : मध्य प्रदेशातील आॅनलाइन ‘रॉयल्टी’ पावतीवर अकोल्यात वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करून, ट्रक मालकास २ लाख ३१ हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी शनिवारी रात्री केली.जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांच्या नेतृत्वातील धाड पथक गस्तीवर असताना अकोल्यातील खडकी येथे रात्री ८ वाजताच्या सुमारास एमएच २८ बीबी-०१४५ क्रमांचा ट्रक वाळूची वाहतूक करताना आढळून आला. यासंदर्भात तपासणी करण्यात आली असता, ट्रक चालकाजवळ मध्य प्रदेशातील आॅनलाइन ‘रॉयल्टी’ची पावती होती. त्या पावतीवर नमूद केल्याप्रमाणे मध्य प्रदेशातील बºहानपूर जिल्ह्यातील दर्यापूर खदान येथून संबंधित ट्रकमध्ये वाळू भरणे आणि यवतमाळ जिल्ह्यात खाली करणे अपेक्षित होते; परंतु ट्रक चालकाने मध्य प्रदेशच्या रॉयल्टीवर बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या भोनगाव येथील वाळू ट्रकमध्ये भरून अकोल्यात खडकीत आणली. खडकी येथे वाळू खाली करताना २.५० ब्रास वाळूचा हा ट्रक जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला. मध्य प्रदेशातील ‘रॉयल्टी’वर अकोल्यात वाळूची अवैध वाहतूक करणाºया ट्रक मालकास २ लाख ३१ हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली असून, दंडाची रक्कम वसूल करण्याची कारवाई अकोला तहसीलदारांकडून केली जाणार आहे.