अकोला : बाळापूर व अकोला तालुक्यात वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे तीन ट्रक व एक ट्रॅक्टर अशी एकून चार वाहने जप्त करून वाहन मालकांना तब्बल ५ लाख ७७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड यांनी बुधवारी केली.जिल्हास्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथक बुधवारी पहाटे ५. ३० वाजता गस्तीवर असताना ३ ट्रक व एक ट्रॅक्टर अवैधरित्या गौणखनिजाची (वाळूची) वाहतूक करताना आढळून आले. एमएच ३० एव्ही ५९२८, एमएच ३० एबी ९४३ , एम.एच. २७ ए ३९८० या क्रमांकाचे ट्रक आणि एम.एच. २८ बीए ९४९४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून एकून ५ ब्रॉस वाळूची अवैध वाहतूक करण्यात येत होती. पथकाने ही चारही वाहने व वाळू जप्त करून वाहन मालकांना ५ लाख ७७ हजार रुपयांचा दंड ठोठावला. चारही वाहने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठेवण्यात आली आहेत. दंड वसूल करण्याची कारवाई अकोला व बाळापूर येथील तहसिलदारांमार्फत करण्यात येणार आहे.
वाळूची अवैध वाहतूक; पावणे सहा लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 4:17 PM