वाडेगाव : येथून जवळच असलेल्या तामशी, चिंचोली गणू शिवारातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याने लाखो रुपयांच्या महसुलाला चुना लागत असल्याचे चित्र आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दिवसाढवळ्या रेतीची अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी गजानन डोंगरे यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
वाडेगावपासून तामशी, चिंचोली गणू व पिंपळगाव या शिवारातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक होत असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याने अनेकांची शेती असून, पिके बहरली आहेत. परिसरात शेतीच्या आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांवर शेतकऱ्यांची, मजुरांची वर्दळ असते. अशातच रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर, टिप्पर भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याबाबत चालकास विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन पळ काढतात. याकडे संबंधित प्रशासन व महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने रेतीची अवैध वाहतूक सर्रास सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन रेतीमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी गजानन महादेव डोंगरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
-----------
या शिवारात जेसीबीद्वारे अवैध उत्खनन
वाडेगावपासून जवळच असलेल्या चिंचोली गणू, तामशी, पिंपळगाव शिवारात जेसीबीद्वारे अवैध उत्खनन सुरू आहे. त्यामुळे शिवारात मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच नदीकाठच्या जागेतूनही वाळूचे अवैध उत्खनन सुरू आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.