वंचितचे एसडीपीओंना निवेदन
अकोट: तेल्हारा पंचायत समितीचे सदस्य व वंचित बहुजन आघाडीचे गट नेता प्रा. संजय हिवराळे यांच्यावर सिरसोली येथे हल्ला झाला. या घटनेचा निषेध करीत, एसडीपीओंना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर उपाध्यक्ष लखन इंगळे, विक्की तेलगोटे, अमन गवई, नितीन तेलगोटे, भाऊसाहेब इंगळे उपस्थित होते.
विजेच्या धक्क्याने व्यक्तीचा मृत्यू
कुरूम: माना येथे पाण्याची विद्युत मोटर सुरू करीत असताना, ५२ वर्षीय व्यक्तीला विजेचा जबर धक्का बसला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. माना येथील नरेंद्र दुर्योधन जामनिक हे विद्युत मोटरचा जबर धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
अवैध दारूचा साठा जप्त
मूर्तिजापूर: विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी गुरुनानक नगर येथे रविवारी छापा घालून उमेश मनीलाल तामसे व पवन राजू तामसे रा. लाखपुरी यांच्याकडून २० हजार ६४० रूपये किमतीचा देशी व विदेशी दारूचा साठा व दुचाकी जप्त केली.
येळवण येथील विघ्नेश्वर यात्रा महोत्सव रद्द
विझोरा: तीर्थक्षेत्र येळवण येथील विघ्नेश्वर संस्थान व श्रीकृष्ण यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला. याठिकाणी दरवर्षी २७ एप्रिलला यात्रा महोत्सव भरत असतो. दरवर्षी महोत्सवात भाविक सहभागी होतात. कोरोनामुळे गतवर्षीपासून यात्रा महोत्सव रद्द करण्यात येत आहे. भाविकांनी यात्रा महोत्सवात येऊ नये, असे कळविण्यात आले.
पिंजर येथे आयुर्वेदिक काढ्याचे वाटप
पिंजर: कोरोनावर मात करण्यासाठी डॉ. परमात्मा ठाकरे यांनी १२५ वनस्पतींपासून काढा तयार केला. या काढ्याचे डॉ. ठाकरे यांनी वाटप केले. यावेळी डॉ. आगलावे, बहिरखेडचे सरपंच किरण ठाकरे, पारडीचे माजी सरपंच सुधाकर महल्ले, ओंकार काकड व आरोग्यसेवक उपस्थित होते.
वाडेगाव येथे अवैध वाहतुकीवर कारवाई
वाडेगाव: वाडेगाव येथे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर २४ एप्रिल रोजी पोलिसांनी कारवाई करीत, सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एमएच ३० बीबी ११२८ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून पोलिसांनी १ ब्रास रेती साठा जप्त केला. आरोपी गणेश सुखदेव राहुडकार यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला.
लाखोंडा येथे शेतमजुराची आत्महत्या
म्हातोडी: येथूनच जवळ असलेल्या लाखोंडा बु. येथील विलास रतीराम भांडे(४०) याने २४ एप्रिल रोजी दुपारी विषारी औषध प्राशन करून घरात आत्महत्या केली.
विलास भांडे हा टॅक्सी चालक असल्याने, तो कुटुंबासह अकोला येथे राहत होता. परंतु कोरोनामुळे तो गावात आला होता. गावात शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. परंतु कोरोनामुळे शेतातील काम बंद असल्याने, मजुरीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
बोरगाव येथील जि.प. शाळेची दुरवस्था
बोरगाव वैराळे: बोरगाव वैराळे येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झाली असून, शाळेच्या दोन खोल्या कधी कोसळेल. याचा नेम नाही. शाळेची आवारभिंत सुद्धा पडली आहे. त्यामुळे शाळेचे बांधकाम करण्याची मागणी सरपंच कल्पना वैराळे, उपसरपंच राजेश्वर वैराळे यांनी केली आहे.
पातूर येथे १३ वाहनांवर कारवाई
पातूर: अकोला-वाशिम रोडवर जिल्हाबंदी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३ वाहनचालकांविरुद्ध रविवारी पोलिसांनी कारवाई करून दंड वसूल केला. मार्गावर वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. तपासणी करून वाहने सोडण्यात येत आहेत.
हनुमान जयंतीदिनी रक्तदान शिबिर
अकोट: रक्ताचा तुटवडा पाहता, हनुमान जयंतीदिनी झुनझुनवाला अतिथीगृह सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन संजय विरवानी यांनी केले आहे.
देगाव-व्याळा रस्त्याच्या कामाला सुरुवात
व्याळा: प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून देगाव-व्याळा रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडण्यात येणार आहे. रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना योद्ध्यांना सुरक्षा किटचे वाटप
हातरूण: कोरोनापासून बचाव करण्यासाठी येथील खासगी डॉक्टरांना नॅशनल व्यायाम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी सरंपच वाजीद खान, संस्थाध्यक्ष नजमा सुलताना अ. समद, मुमताज खान, राजिक खान, मोबीन खान, मसरत जावेद, कय्युम शाह, शेख फरहान आदी उपस्थित होते.
अज्ञात आजाराने युवकाचा मृत्यू
उरळ: उरळ पोलीस ठाण्यांतर्गत बादलापूर येथील आनंद शेषराव सिरसाट(२४) याच्या मृत्यूप्रकरणी उरळ पोलिसांनी रविवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आनंद सिरसाट याला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.