अकोला : वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक व एक टॅÑक्टर पकडून दोन्ही वाहन मालकांना ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री केली.जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांच्या नेतृत्वातील जिल्हास्तरीय आकस्मिक धाड पथक बुधवार, १ मे रोजी रात्री गस्तीवर असताना, रात्री ११ वाजताच्या सुमारास अकोला तालुक्यातील चांदूर फाटा येथे एमएच २८ एबी-७५३५ क्रमांकाचा ट्रक आणि व्याळा येथे एमएच ३० एबी-६३२१ क्रमांकाचा ट्रॅक्टर ही दोन्ही वाहने वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आले. वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन्ही वाहने पकडून, वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आल्याने ट्रक मालकास २ लाख ३३ हजार रुपये आणि टॅÑक्टर मालकास १ लाख १७ हजार रुपये असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी केली. दंड वसूल करण्याची पुढील कारवाई अकोला तहसीलदारांकडून करण्यात येणार आहे.