पोपटखेड परिसरातील खदानीतून गौण खनिज वाहतूक करणारे वाहन क्र. (एमएच १६ सीसी ४६३२) गाजीपूर तपासणी नाक्यावर अडवून तपासणी केली असता गौण खनिज ए. सी. शेख (रा. अकोला) या खरीदाराचे होते. या राॅयल्टीवर गौण खनिज वाहतुकीची वेळ सकाळी १० ते दुपारी २ देण्यात आली होती, परंतु वाहनचालक दुपारी ४ वाजता गौण खनिज वाहतूक करताना आढळून आला. त्यांच्याकडे दुपारी वाहतूक करण्याचे वेळेची राॅयल्टी आढळून आली नाही. त्यामुळे वाहनातून अवैधपणे सहा ब्रास गौण खनिज वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले. वाहन जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे. ही कारवाई अकोट तहसीलदार निलेश मडके, एस. एस. साळवे मंडळ अधिकारी, तलाठी संजय तळोकार, इरफान सरदेशमुख, संजय वाळके, जयश्री बेलसरे, अस्मिता अवारे व महसूल मित्र अमोल पाटील यांनी केली.
------------------------------
कारवाई टाळण्यासाठी वाहनाचे टायर पंक्चर झाल्याचा बनाव
गाैण खनिजाची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतर वाहनचालकाने वाहनाचे टायर पंक्चर झाल्याचे कारण देत तपासणी नाकावर बयाण देताना कारवाई मान्य नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे टायर पंक्चर झाल्याची माहिती महसूल विभागाकडे पुराव्यासह त्याच वेळी देणे आवश्यक होते, परंतु कारवाई टाळण्यासाठी वाहनाचे टायर पंक्चर झाल्याचा बनाव केल्याची चर्चा आहे. तर वाहन जप्त केल्यानंतर वाहन पोलीस स्टेशनला लावण्यासाठी जागा नसल्याचे कारणे देत सुपूर्द नाम्यावर वाहन सोडण्याचे प्रयत्न सुरु होते, परंतु अधिकारी,कर्मचाऱ्यांनी वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले.