अकोला, दि. २४- इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला शाखेची शुक्रवारी दुपारी स्व. डॉ. चारुशीला काळे स्मृती सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेमध्ये डॉक्टरांवर होणार्या हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, तसेच आयएमएचे अध्यक्ष डॉ. कैलास मुरारका, सचिव डॉ. जुगल चिराणिया, डॉ. किशोर पाचकोर यांचा कार्यकाळ संपत असल्याने, आयएमएच्या नवनियुक्त अध्यक्षपदी डॉ. पुरुषोत्तम तायडे यांच्या आणि सचिवपदी डॉ. रणजित देशमुख यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. आयएमए अकोला शाखेच्या शुक्रवारी झालेल्या सभेमध्ये राज्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि राज्याच्या आयएमए पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमक्ष मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून, त्याचे लवकरच आदेश दिल्या जातील, असे स्पष्ट केल्याचे सभेत सांगण्यात आले. या सभेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता डॉक्टरांचीही उपस्थिती होती. या डॉक्टरांनीसुद्धा त्यांना रुग्णसेवा करताना रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. प्रसंगी त्यांना मारहाणही करण्यात येते, अशी माहिती सभेत दिली. त्यासाठी शासनाने आम्हाला संरक्षण द्यावे आणि आयएमएच्या पदाधिकार्यांनी आमच्या पाठीशी उभे राहावे, असे सांगितले. यावेळी अध्यक्ष डॉ. कैलास मुरारका, सचिव डॉ. जुगल चिराणिया, डॉ. किशोर पाचकोर यांचा कार्यकाळ संपत असल्याने, त्यांच्या जागेवर आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे आणि सहसचिव डॉ. रणजित देशमुख यांची अध्यक्षपदी व सचिवपदी घोषणा करण्यात आली. लवकरच त्यांचा पदग्रहण समारंभ घेण्यात येईल. या समारंभात डॉ. मुरारका व डॉ. चिराणिया हे त्यांच्याकडे पदभार सोपवतील.
आयएमएच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम तायडे, सचिव रणजित देशमुख
By admin | Published: March 25, 2017 1:16 AM