अकोला : सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या आयुर्वेदिक शिक्षण आणि व्यवसाय नियमन करणाऱ्या संस्थेने आयुर्वेद शिक्षण घेतलेल्या स्नातकांना शस्त्रक्रियेची मान्यता दिली आहे. या निषेधार्थ आयएमएतर्फे साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. बुधवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनात जवळपास ५०० वैद्यकीय अभ्यसक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मिक्सोपॅथी धोरणाचा निषेध व्यक्त केला.
सीसीआयएम म्हणजेच सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या आयुर्वेदिक शिक्षण आणि व्यवसाय नियमन करणाऱ्या संस्थेने भारताच्या राजपत्रात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकानुसार, आयुर्वेदिक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आयएमए व मेडिकल स्टुडंट नेटवर्कतर्फे मंगळवारपासून दोनदिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी ८०० डॉक्टर साखळी उपोषणात सहभागी झाले होते, तर बुधवारी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ५०० विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेत मिस्कोपॅथीचा निषेध व्यक्त केला. आयुर्वेद हे एक अतिशय प्राचीन शास्त्र असून, त्याचा निश्चितच अभिमान आहे; परंतु त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यांचे शास्त्र सोडून आधुनिक वैद्यक शास्त्रात येऊन शस्त्रक्रिया कराव्यात या निर्णयाला आयएमएचा विरोध आहे. यासंदर्भात आयएमएतर्फे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळेच परिपत्रकात नमूद करण्यात आलेल्या सूचनांचा विरोध आयएमए करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन ही आधुनिक वैद्यकशास्त्रातील अर्हताप्राप्त व्यावसायिकांची संघटना असून देशभर या विरोधात आंदोलन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून साखळी उपोषण सुरू करण्यात येत असल्याचे आयएमएतर्फे सांगण्यात आले. समाजाच्या शास्त्रोक्त आणि प्रमाणित आरोग्यसेवेसाठी आणि आयुर्वेदाच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी आयएमएतर्फे करण्यात आली आहे.
जीएमसीतही केली निदर्शने
मिक्सोपॅथीच्या विरोधात बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास ५०० वैद्यकीय विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिक्सोपॅथीविरोधात निदर्शने दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आयएमए सभागृह येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभाग नोंदविला.