मूर्तिजापूर : तालुक्यात संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच पावसामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देण्याची मागणी करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दि. ९ सप्टेंबर रोजी राजेंद्र मोहोड यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन दिले आहे. यापूर्वीही जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांना निवेदन दिले आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यात गत आठवड्याभरापूर्वी अतिवृष्टी झाली आहे. शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल विभाग व कृषी विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले होते. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. पीक विमा कंपनीने दिलेला टोल फ्री नंबर नेहमी बंद असल्याने नोंद कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फसवणूक केली असून, त्यांच्यावर कायदेशीर करवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना राजेंद्र मोहोड, दिलीप इनवाते, रक्षित पाटील, राजू गावंडे, प्रदीप पाटील, शुभम मोहोड, निखिल ढाकरे, तुषार दाभाडे, सचिन गावंडे, अतुल गावंडे, देवानंद ठोकळ, मयूर वहिले व इतर कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती ऐश्वर्या मोहोड यांनी दिली.
--------------------
अन्यथा एसडीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
तालुक्यातील सर्व मंडळात दि. ६ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली असून, पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनस्तरावर तत्काळ मदत द्यावी, अन्यथा दि. २७ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
-------------------