लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनामुळे ‘जीएमसी’मधील प्रसूती विभाग केवळ बाधित गर्भवतींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयाचा भार वाढला आहे. ही बाब लक्षात घेता दोन दिवसात येथील परिचारिका व वर्ग-४ ची रिक्त पदे भरण्यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांना निर्देश दिले होते; परंतु प्रत्यक्षात येथील परिचारिकांची रिक्त पदे ही पदोन्नतीची असल्याने ती तत्काळ भरणे शक्य नाही. त्यामुळे केवळ वर्ग ४ ची रिक्त पदे तत्काळ भरण्यात येणार असल्याची माहिती आहे.अकोल्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे गुरुवारी अकोला दौऱ्यावर होते. यावेळी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील प्रसूती विभाग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. यामुळे सर्व महिलांना जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यासोबतच जिल्हा स्त्री रुग्णालयात या महिलांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ याचाही आढावा घेतला होता. दरम्यान, त्यांनी परिचारिकांसह वर्ग ४ ची रिक्त पदे दोन दिवसात भारण्याचा आदेश दिला होता; परंतु जिल्हा स्त्री रुग्णालयातील परिचारिकांची पदे ही पदोन्नतीची असल्याने ती तत्काळ भरणे शक्य नाही. आशा परिस्थितीत केवळ वर्ग ४ ची रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. पद भरतीसंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अशी आहेत रिक्त पदेजिल्हा स्त्री रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शुश्रूषा संवर्गातील १६ पदे रिक्त आहेत. ही सर्व रिक्त पदे पदोन्नतीची असल्याने त्यांची थेट भरती शक्य नाही. तर वर्ग ४ मधील १९ पदे रिक्त आहेत. या पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
कंत्राटी पद भरतीजिल्हा स्त्री रुग्णालयातील पद भरती ही पूर्णत: कंत्राटी स्वरूपाची राहणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने ही पद भरती रबविणे शक्य आहे.जिल्हा स्त्री रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शुश्रूषा संवर्गातील पदे रिक्त आहेत. ही सर्व रिक्त पदे पदोन्नतीची असल्याने त्यांची थेट भरती शक्य नाही; मात्र वर्ग ४ मधील १९ पदे रिक्त आहेत. या पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.- डॉ. आरती कुलवाल,वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.