दरवर्षी शाडूच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून जनजागृती करण्यात येते, तरीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना जास्त पसंती मिळते. यावर्षी कोरोनामुळे गणेशमूर्तीच्या उंचीसह विसर्जनावरही बंधने आली आहेत. सार्वजनिक उत्सव मंडळाला ४ फुटांपेक्षा उंच मूर्तीची स्थापना करण्यास मनाई आहे. मूर्तिकारांकडून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच जास्त प्रमाणात विक्री होण्याचा अंदाज आहे. मात्र, या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. यामुळे विसर्जन करताना पाण्यात खाण्याचा सोडा घालण्याचा पर्याय चांगला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
७२ तासांत विरघळते मूर्ती
विसर्जनावेळी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती खाण्याचा सोडा घातलेल्या पाण्यात ठेवावी. ७२ ते ९६ तासांमध्ये ही मूर्ती विरघळत असल्याचा तज्ज्ञांना अंदाज आहे. त्यापासून प्लास्टर ऑफ पॅरिस, गवत, रंग व अन्य घटक सुटे होतात.
नंतर खत म्हणून करा पाण्याचा वापर
मूर्ती पूर्ण सामावू शकेल, अशी बादली प्रथम घ्यायला हवी. त्यात पुरेसे पाणी ओतावे. जितके वजन मूर्तीचे आहे, तितक्याच वजनाचा खाण्याचा सोडा बादलीमध्ये टाकावा.
मूर्ती विरघळल्यानंतर भांड्यातील पाण्याचे अमोनियम सल्फेटमध्ये, तर पीओपीचे कॅल्शिअम कार्बोनेटमध्ये रूपांतर होते. हे पाणी झाडांना खत म्हणून वापरता येते.
पीओपीच्या मूर्तींचीच अधिक विक्री
पीओपी शाडू माती
२०१९ १५०७४० २५३२०
२०२० ११७९५० १५०८०
२०२१ (अपेक्षित) १६०००० ५००००
...असे असावे खाण्याच्या सोड्याचे प्रमाण
मूर्तीची उंची पाण्याचे प्रमाण (लिटरमध्ये) खाण्याचा सोडा (किलो)
७ ते १० इंच १२ २
११ ते १४ इंच २० ते २२ ४
१५ ते १८ इंच ५० ६
पीओपीच्या मूर्ती विसर्जनासाठी सोड्याचा उपयोग होतो; पण सोड्याची किंमत जास्त असल्यास ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे या मूर्ती विघटनाची व्यवस्था महानगरपालिकेने करावी. जेणेकरून सर्वसामान्यांवर आर्थिक भार पडणार नाही.
-शरद कोकाटे, मूर्तिकार