अकोला : शहरापासून जवळच असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या घाटावर गुरुवारी श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले. अकोला शहरासह परिसरातील विविध गणेश मंडळांनी पूर्णा नदीच्या घाटावर बाप्पाला निरोप दिला. त्यामुळे गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने रात्री दहा वाजेपर्यंत शोध व बचाव कार्याची कामगिरी बजावली.
अकोला शहरातील काही गणेशोत्सव मंडळांसह परिसरातील लहान मोठ्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या घाटावर करण्यात आले. त्यामुळे गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी उसळली होती. त्यानुषंगाने पूर्णा नदीच्या घाट परिसरात पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांच्या नेतृत्वात शोध व बचाव पथक तैनात करण्यात आले. या पथकाने शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत शोध व बचाव कार्याची कामगिरी बजावली.
तीन जणांना वाचविले!शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध व बचाव कार्याच्या कामगिरीत नदीपात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करणाऱ्या एका भाविकास तसेच लहान पुलाजवळून मोठ्या पुलाकडे धारेत पोहत असलेल्या एका व्यक्तीस आणि नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीस अशा एकूण तीन जणांना शोध व बचाव पथकाने वाचविले.