अकोला - जनता भाजी बाजारासह जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ विक्रेते इथिलीन स्प्रे, पावडर आणि कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेली फळे विक्री करीत असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकार यांनी सोमवारी दुपारी जनता भाजी बाजारात छापेमारी केली. या ठिकाणावरून तब्बल एक ट्रकच्यावर इथिलीन पावडरने पिकविलेल्या आंब्यांचा साठा तपासणी करण्यात आला आहे. विशेष पथकाच्या या हटके कारवाईनंतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली असून, आता योग्य ते आंबेच नागरिकांना मिळणार असल्याची माहिती आहे.जनता भाजी बाजारातील व्यापाऱ्यांसह जिल्ह्यातील काही व्यापारी कृत्रिमरीत्या पिकविलेल्या आंब्यांची सर्रास विक्री करीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकार यांना मिळाली. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त लोभसिंह राठोड यांच्यासह जनता भाजी बाजारातील अमीर शहा इस्माईल शहा याच्या गोदामाची तपासणी केली असता, प्रत्येक कॅरेटमध्ये आंबे तसेच फळांसोबत इथिलीन पावडरच्या तब्बल ६ ते ८ पाकीट ठेवण्यात आल्याचे उघड झाले. इथिलीन स्प्रे हा आंबे पिकविण्यासाठी वैध असल्याचे व तशी परवानगी असल्याचे आंबे विकणाºया ठोक व्यावसायिकांचे म्हणणे आहे; मात्र या इथिलीन स्प्रेचा आणि चायनीज पावडरचा १०० पार्ट पर मिलियन (पीपीएम) यापेक्षा अधिक प्रमाणात वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश असताना तब्बल ५०० ते ६०० पार्ट पर मिलीयन एवढ्या अधिक प्रमाणाचा वापर करून फळ पिकविण्यात येत असल्याचा पर्दाफाश विशेष पथकाने केलेल्या कारवाईत झाला. मागणीच्या तुलनेत प्रचंड तूट असल्यामुळे व्यापारी पहिल्या दिवशी आलेले कच्चे आंबे दुसºयाच दिवशी पिकविण्याचा अजब गजब फंडा वापरत आहेत. इथिलीन आणि कॅल्शियम कार्बाइडने फळ पिकविण्याचा गौरखधंदा सर्रास सुरू असताना याकडे कानाडोळा होत होता; मात्र विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकार यांनी याची पाळेमुळे शोधून काढत एका गोदामावरच कारवाई केल्याने जिल्ह्यातील ग्रामस्थ व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणावरून आंब्यांच्या एका कॅरेटमध्ये पुडीत बांधलेली चायनीज पावडर मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली असून, ती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने नमुने घेऊन ते चाचणीसाठी पाठविले असून, त्याचा अहवाल येताच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.