अकोला: उण्यापुऱ्या पावणेतीन किलोमीटर लांबीच्या गोरक्षण रस्त्याच्या कामाला दोन वर्षांचा कालावधी होत आहे. रस्त्याला अडथळा ठरणाºया इमारतींचा भाग हटविण्यास मनपा प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाची जबाबदारी असणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर, गुरुवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नगररचना विभाग व विद्युत विभागातील अधिकाºयांना रस्त्याची समस्या तातडीने निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले.नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे गोरक्षण रस्त्याचे रूंदीकरण रखडल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याची एक बाजू अर्धवट सोडली आहे. हाच प्रकार एसबीआय बँक ते श्रद्धा हाईट्स ते कांचन किराणापर्यंत केल्याचे दिसून येते. रस्त्याचे अर्धवट बांधकाम करून कंत्राटदाराने हात वर केले आहेत. महापारेषण कार्यालय ते छत्रपती चौकापर्यंत रस्त्यालगतच्या इमारतींचा काही भाग हटविण्याची प्रक्रिया ठप्प पडली आहे. परिणामी विद्युत पोलचे शिफ्टींग रखडले. इन्कम टॅक्स चौकातील दोन्ही बाजूंच्या इमारतींचा काही भाग हटविताना प्रशासनाने धडक कारवाई केली होती. ही कारवाई थंड बस्त्यात सापडल्यामुळे सिमेंट रस्त्याचे काम रेंगाळल्याची वस्तुस्थिती आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने व विद्युत विभागाने धडक कारवाई करणे अपेक्षित आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दोन्ही विभागाला कामाला लावले आहे.मालमत्ताधारकांसोबत केली चर्चा!महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या स्थानिक मालमत्ताधारकांसोबत मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी त्यांच्या दालनात चर्चा केली. मनपाने विकास कामासाठी गोरक्षण रस्त्याच्या आरक्षणात बदल केला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम निकषानुसार होत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तर विकास कामांना आमचा अडथळा नसल्याचे मालमत्ताधारकांनी सांगितले.
विद्युत खांब हटवा!महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत डाव्या बाजूने नव्याने विद्युत पोल उभारायचे आहेत. त्यासाठी काही इमारतींचा भाग तसेच आवारभिंती आडव्या येत असतील, तर त्या तातडीने हटवा, रखडलेले काम दोन दिवसांत निकाली काढण्याचे निर्देश आयुक्त जितेंद्र वाघ यांनी विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांना दिले.