सायखेड (जि. अकोला) : बाश्रीटाकळी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मुंगसाजीनगर या आदिवासीबहुल परिसराला १७ सप्टेंबरच्या दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास विनाशकारी वादळाचा फटका बसला. यामध्ये वनामधील शेकडो सागवान झाडे मुळासकट उन्मळून हवेत उडाल्याचे दृश्य गावकर्यांनी पाहिले. ही विनाशकारी दृश्य अनेकांनी 'याची डोळा' पाहिले. प्राथमिक माहितीवरून शेकडो वृक्ष उन्मळून पडले असल्याचे दिसत असले तरी गावकर्यांच्या मते हजाराच्यावर सागवान झाडे पडली आहेत. मुंगसाजीनगर या गावाची लोकसंख्या ४५0 च्या आसपास आहे. निसर्गाचे हे तांडव सुरू असताना ग्रामस्थ ते पाहत जीव मुठीत धरून घरात बसले होते. अगदी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सागवान जंगलात व शेतांमध्ये हे वादळ घुसले आणि गावकरी या विनाशकारी संकटातून वाचले. या भागात वेळेवर व पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी दुष्काळी संकटात सापडले होते. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने वादळाच्या घटनेपूर्वी पाच तास आधी येथील गावकर्यांनी पाऊस पडण्यासाठी ईश्वरापुढे प्रार्थना केली; परंतु नंतर मात्र निसर्गाच्या या तांडवाला पाहून आदिवासी ग्रामस्थांनी देवाकडे जीव वाचविण्यासाठी व गावाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली.
मुंगसाजीनगरला वादळाचा फटका
By admin | Published: September 18, 2015 1:00 AM