अकोला : केंद्र शासनाने जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग अमलात आणला असून, राज्य शासनाने सरकारी तथा निमसरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू केल्या आहेत. राज्यातील बहुतांश महापालिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला; परंतु अकोला मनपातील कर्मचाऱ्यांना अद्यापही सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला नसून, तो तातडीने लागू करण्याची मागणी विरोधी पक्षनेता साजीद खान पठान यांनी पत्राद्वारे प्रभारी आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे केली आहे.
मनपा प्रशासनाने आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचे कारण सांगत कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग, रजा रोखीकरण, कालबद्धसारखी थकीत देणी न दिल्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची देणी बाकी असली तरी दुसरीकडे सातव्या
वेतन आयोगाची सन २०१६ पासून ते आजपर्यंतच्या फरकाची रक्कमसुद्धा महानगरपालिकेवर वाढत चालली आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगातील फरकाची थकीत वाढ थांबविण्यासाठी कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यास फरकाच्या थकीत रकमेचा बोजा कमी राहील, अशी सूचना साजीद खान यांनी केली आहे.