अकोला : दिव्यांगांसाठी राखीव पाच टक्के निधी खर्च करून, दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना गुरुवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, महानगरपालिका उपायुक्त पंकज जावळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी समाजकल्याण अधिकारी पुंड आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांतर्गत दिव्यांगांसाठी राखीव पाच टक्के निधीतून जिल्ह्यातील दिव्यांगांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
राखीव निधी खर्चाचा
घेतला आढावा !
महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत दिव्यांगांसाठी राखीव पाच टक्के निधी आणि त्यामधून आतापर्यंत झालेला खर्च यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत आढावा घेतला. राखीव निधीतून दिव्यांगांच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले.