- संजय खांडेकरअकोला : जीएसटीच्या महसुलात वाढ व्हावी म्हणून परिषदेने ई-वे बिलिंगची अंमलबजावणी फेब्रुवारीपासून देशभरात करण्याचा प्रयत्न केला. पैकी अनेक राज्यात अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी ई-वे बिलिंगसाठी सज्ज होता आले नाही. त्यामुळे ज्या राज्यात ई-वे बिलिंगकरिता अडचणी येत आहेत, अशा राज्यात जनजागृतीसाठी कार्यशाळा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे जीएसटी अधिकारी आणि कर्मचारी आता ई-वे बिलिंगच्या जनजागृतीसाठी व्यावसायिक संघटनांच्या कार्यालयात कार्यशाळा भरविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात तरी ई-वे बिलिंगची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत.फेब्रुवारीपासून देशातील विविध राज्यांनी ई-वे बिलिंगसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन जीएसटी परिषदेने प्रत्येक राज्यांना केले होते. बोटावर मोजण्याइतपत राज्यांनी ई-वे बिलिंगसाठी तत्परता दाखविली. मात्र अजूनही अनेक राज्यातील स्थिती ई-वे बिलिंगसाठी चांगली नाही. त्यामध्ये महाराष्ट्रही आहेच. फेब्रुवारीपासून ई-वे बिलिंग आवश्यक करीत असताना त्याची पूर्वतयारी करण्यात आली नाही. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, ई-वे बिलिंगसंदर्भात व्यापारी संघटना, वाहतूकदारांच्या संघटना आणि चेंबर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या जात आहेत. मात्र, संगणक साक्षरतेचे धडे गिरविताना अनेक अडचणी वाहतूकदारांना येत असल्याने आता ई-वे बिलिंग अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत.