- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खाद्य तेलाच्या आयातीवर इम्पोर्ट ड्युटी लावण्यासंदर्भातील सरकारचे धोरण निश्चितही झालेले नसताना बाजारपेठेत तेलाचे भाव वधारले आहे. तेलाच्या भावात होत असलेल्या कृत्रिम भाववाढीमुळे सर्वसामान्य लोकांच्या घरातील भाजीची फोडणी महागली आहे.देशांतर्गत लागणाऱ्या खाद्य तेलाच्या मागणीच्या तुलनेत तेलाची निर्मिती करणे अजूनही शक्य नाही. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्य तेल देशात आयात करण्याची वेळ येते. ही व्यवस्था गत अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. अब्जावधीची उलाढाल जागतिक पातळीवर होते. यावर लक्ष केंद्रित करून सरकारने अधिवेशनात आयात धोरणात बदल करण्यावर चर्चा केली. त्यात तेलाची इम्पोर्ट ड्युटी ३ ते १० टक्क्यांपर्यंत का वाढविण्यात येऊ नये, यावर चर्चा झाली. सरकारने अद्याप आयात धोरणावर चर्चा सुरू केलेली असली तरी देशातील तेल बाजारातील भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. खाद्य तेल आयात धोरण निश्चित होण्याआधीच बाजारपेठ तेलाचे भाव वाढले आहे. बाजारातील काळाबाजार थांबविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.
खाद्य तेलाच्या इम्पोर्ट ड्युटी वाढविण्याचा किंवा सेस लावण्याचा सरकार निर्णय होणार आहे. त्यावर विचारविनिमय सुरू आहे; मात्र तेल भाववाढ अजून तरी झालेली नाही. त्यामुळे कुणी करीत असेल तर ते चुकीचे आहे.-वसंत बाछुका, उद्योजक अकोला.या महिन्यातील किराणा खरेदीच्या तेलामध्ये पाच लीटरमागे १८५ रुपये जास्त घेण्यात आले. विचारणा केली असता, तेलाचे भाव वाढल्याचे सांगितले जात आहे. भाववाढीच्या नावावर ही लूट असून, त्यावर अंकुश लावण्याची गरज आहे.-सतीश हिवराळे, नागरिक