अकोला : मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील २२ वर्षी युवक आकाश सोळंके याने एका अल्पवयीन मुलीला प्रेमात गुंतवून शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व दीड लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.
आकाश सोळंके याने १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी प्रेमसंबंध जोडून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. या मुलीने मूर्तिजापूर पोलीस स्टेशनला तक्रारीवरून १९ नोव्हेंबर २०१६ रोजी पोस्को व भादंविच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला शासकीय स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे असताना तिची प्रसूती होऊन तिने मुलाला जन्म दिला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग सोळंके यांनी केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने आकाशला आजन्म कारावास व दीड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असून, सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. सरकार पक्षाची बाजू सहायक सरकारी वकील किरण खोत यांनी मांडली. पैरवी अधिकार म्हणून पीएसआय प्रवीण पाटील व नारायण शिंदे यांनी काम बघितले.
अशी ठाेठावली शिक्षा
सरकार पक्षातर्फे गुन्हा सिद्ध करण्यासाठी सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने साक्षीपुरावे ग्राह्य धरून आकाश सोळंकेला भादंवि ३७६ (दोन) (तीन) मध्ये जन्मठेपेचे शिक्षा व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, पोस्को कलम चारमध्ये जन्मठेप व ५० हजार रुपये व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, पोस्के कलम पाच (एक)मध्ये जन्मठेप व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.