लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खारपाणपट्ट्यातील गावांसाठी तयार झालेल्या नेर धामणा (पुर्णा) बॅरेजमधून कोणतीही पाणीपुरवठा योजना निर्मिती होणार नाही. त्यासाठी पूर्णा नदीकाठावर असलेल्या ७० ते ७५ गावांना यापुढेही इतर स्त्रोतांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी कवठा व नया अंदुरा लघू पाटबंधारे योजनेतून नवीन योजनांच्या निर्मितीचे पर्यायी प्रस्ताव तयार करण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर आली आहे. राष्ट्रीय पर्यावरण, अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) यांनी दिलेल्या तपासणी अहवालात पूर्णा नदीचे पाणी प्रचंड दूषित असून, ते पाणीपुरवठा योजनांसाठी वापरू नये, असा इशारा आधीच दिलेला आहे.पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय पर्यावरण, अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) नागपूरसोबत सामंजस्य करार केला. कराराप्रमाणे पहिल्या टप्प्यात १२ जिल्ह्यांतील पाणी नमुने तपासणीसाठी देण्यात आले. त्यामध्ये खारपाणपट्टा असलेले अमरावती, अकोला व नागपूर जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीतील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला देण्यात आला. त्यासोबतच पूर्णा नदीच्या पाण्यावर कोणती प्रक्रिया करावी, याबाबतही निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यामुळे धामणा बॅरेजमध्ये पाण्याची साठवण सुरू झाली तरी त्यातून पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणारच नाही.22 गावांच्या अपेक्षेवर फिरले पाणीअकोला तालुक्याच्या खारपाणपट्ट्यातील कायम टंचाईग्रस्त २२ गावांमध्ये आगर, उगवा, पाळोदी, नवथळ, सुकोडा, कानडी, अमानतपूर, मोरगाव (भाकरे), खडकी टाकळी, माझोड, निराट, सांगवी खुर्द, भोड, सांगवी मोहाडी, धामणा, सिसा, मासा, निपाणा, लोणाग्रा, दुधाळा, मंडाळा, टाकळी जलम, वैराट राजापूर, कंचनपूर व गोपालखेड या गावांचा समावेश आहे.भूगर्भातील पाणी पातळी लक्षात घेता भूपृष्ठावरील जलस्रोतातून या गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना उभारण्याची गरज आहे. त्यासाठी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचेही पाणीपुरवठा विभागाला निर्देश दिले होते. नीरीच्या अहवालामुळे त्यावर पाणी फिरले आहे.तपासणीमध्ये उघड झाले विषारी घटकपाण्याच्या नमुन्यांमध्ये जड धातू प्रकारातील तांबे, लोह, झिंक,नायट्रेटसह नऊ घटक, कीटकनाशके प्रकारातील एंडोसल्फान, अॅल्ड्रीन, डिकोफोलसह ५ घटक, रसायने प्र्रकारातील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या घटकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी काही घटकांचे प्रमाण प्रचंड असल्याचे अहवालात पुढे आले आहे.
नेर धामणा बॅरेजमधून पाणीपुरवठा अशक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:42 AM