अकोला: जागतिक महिला दिनी शहरासह जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांचा कारभार महिला पोलिसांनी हाकला; मात्र आकोट फैल पोलिसांनी केवळ कारभारच सांभाळला नाही, तर पूरपीडित कॉलनीमध्ये सुरू असलेल्या एका जुगार अड्डय़ावर छापा मारून चार जुगारींना अटक केली. अकोट फैलच्या प्रभारी ठाणेदार छाया वाघ यांनी ही कारवाई केली.राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनी राज्यातील पोलीस ठाण्यांचा सर्व कारभार महिलाच सांभाळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर व शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अकोला शहरासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा कारभार महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या खांद्यावर होता. आकोट फैल पोलीस स्टेशनचा कारभार प्रभारी ठाणेदार छाया वाघ यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी दिवसभराचे कामकाज सुरळीत पार पाडले. पोलीस ठाण्याचे कामकाज सांभाळून वाघ यांनी पूरपीडित कॉलनीमधील एका जुगार अड्डय़ावर छापा मारून चार जुगारींना अटक केली. यामध्ये पूरपीडित कॉलनी येथील रहिवासी भीमराव जयराम अंभोरे, सैयद अबरार सैयद यासीन, शेख जाकीर शेख आमद व मोहम्मद अंसार मोहम्मद इशाक या चार जणांचा समावेश आहे. जुगारावर छापा मारताच महिला पोलीस कर्मचार्यांना बघून जुगारी पळाले; मात्र या महिला अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांना घेरून अटक केली. शहरातील महिला पोलीस अधीकार्यांनी ठाणेदारांची भूमिका चोख बजावली, तर महिला पोलिसांनीही त्यांना तेवढीच मदत करीत गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई प्रभारी ठाणेदार छाया वाघ यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस कर्मचार्यांनी केली. त्यांना अजाबराव वानखडे, विलास बंकावार, विजय चव्हाण व उमेश सोळंके यांनी सहकार्य केले.
आकोट फैलमध्ये महिला पोलिसांचा जुगारावर छापा
By admin | Published: March 09, 2016 2:19 AM