अकोला : खारपाणपट्ट्यातील पूर्णा बॅरेज (नेर-धामणा) प्रकल्पासाठी ८८८ कोटी तसेच कारंजा रमजानपूर प्रकल्पाच्या २६१ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावाला मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. या मंजुरीवर १८ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह इतर भागातील शेतक ऱ्यांना सिंचनाचा लाभ व्हावा म्हणून सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या उद्देशातून पूर्णा, काटेपूर्णा आणि मोर्णा नदीवरील बॅरेजच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावांना मंजुरी देण्याची मागणी करीत खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांनी २८ आॅगस्ट रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यानुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्णा बॅरेज व कारंजा रमजानपूर प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’ला मंजुरी देऊन हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून, दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे जलसंपदा विभागाला दिले होते. या प्रस्तावांना स्वीकृती देत मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.अशी आहे सुप्रमा!कारंजा रमजानपूर (संग्राहक)बृहत लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या २११ कोटी १५ लाख मंजूर करण्यात आले आहे. आत्महत्याग्रस्त बाळापूर तालुक्याच्या सहा गावांमधील १७९० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.तेल्हारा तालुक्यातील पूर्णा बॅरेज-२ (नेर-धामणा) मध्यम प्रकल्पाच्या ८८८ कोटी ८१ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे आत्महत्याग्रस्त अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यातील ३२ गावांमधील ६९५४ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.