अकोला : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जिल्हय़ातील सुकळी संग्राहक लघू पाटबंधारे योजनेच्या कामासाठी शासन निर्णयानुसार सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार योजनेच्या कामासाठी २४ कोटी ११ लाख ८२ हजार ५00 रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.जिल्हय़ातील सुकळी संग्राहक लघू पाटबंधारे योजनेच्या कामासाठी यापूर्वी १८ जून २00७ मध्ये ११ कोटी ७ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या योजनेच्या कामास सन २00९ सुरुवात करण्यात आली. दरम्यानच्या काळात योजनेच्या कामासाठी दर सूचीत झालेली वाढ, भूसंपादन खर्चातील वाढ, जास्त दराची निविदा स्वीकृती, संकल्पनातील बदल व इतर कारणांमुळे या योजनेच्या कामाच्या किमतीत दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. त्यामुळे सुकळी संग्राहक लघू पाटबंधारे योजनेच्या कामासाठी एकूण अंदाजे खर्चासाठी २४ कोटी ११ लाख ८२ हजार ५00 रुपयांच्या किमतीस २६ जून २0१४ च्या शासन निर्णयानुसार सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या योजनेच्या कामासाठी २३ कोटी ६ लाख ५५ हजार ५00 रुपये आणि १ कोटी ५ लाख २७ हजार अनुषंगिक खर्च आहे. योजनेची उर्वरित कामे सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या किंमतीत पूर्ण करण्याच्या अटीला अधीन राहून मान्यता देण्यात आली.**५२३ हेक्टर सिंचन क्षमतेची योजना! जिल्हय़ातील सुकळी संग्राहक लघू पाटबंधारे योजनेची सिंचन क्षमता ५२३ हे क्टर इतकी आहे. या योजनेमुळे ४ हजार ३९0 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा होणार आहे. या योजनेच्या कामासाठी शासनामार्फत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुकळी पाटबंधारे योजनेला सुधारित प्रशासकीय मंजुरी
By admin | Published: June 30, 2014 1:20 AM