अकोला : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे आणि त्यासाठी शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण ठेवून शाळांची नियमित तपासणी, पर्यवेक्षण व्हावे. या उद्देशातून आता केंद्र शाळांच्या (क्लस्टर रिसोर्स सेंटरच्या) माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने २0 जानेवारी रोजी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी यापूर्वीच अकोल्यात हा निर्णय राबविण्यास सुरुवात केली आहे.विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण व मदत पुरविण्यामध्ये केंद्र शाळा महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षकांमध्ये सतत व्यावसायिक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक शैक्षणिक व अभ्यासक्रमविषयक प्रणाली सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शाळांच्या अंतर्गत नियमित भेटी व मासिक बैठका आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्र शाळेला त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांना नियमित भेटी देऊन, त्याद्वारे त्यंना प्रत्यक्ष शैक्षणिक मदत पुरविण्यासाठी आणि त्याचा अहवाल प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पाठविण्यासाठी प्रोजेक्ट अॅप्रुव्हल बोर्ड अंतर्गत २0१९-२0 साठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे केंद्र प्रमुखांसाठी शाळांमधील पायाभूत सुविधा, शिक्षक, विद्यार्थी व इतर शैक्षणिक बाबींची नियतकालिक तपासणी करण्यासाठी प्रश्नसंच, सूचना तयार करण्यात आल्या आहेत. केंद्र शाळा ही शैक्षणिक संशोधन संस्था म्हणून शिक्षकांसाठी काम करणार असून, केंद्र प्रमुखाने शाळेतील शैक्षणिक समस्यांवर दर महिन्याला बैठक घेऊन शाळेच्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. तसेच शाळाबाह्य मुलांना त्यांच्या वयानुसार शाळेत दाखल करून घेणे, प्रत्येक शाळेस दोन महिन्यांतून एक भेट देऊन शिक्षकांना शैक्षणिक मदत पुरविण्याचेसुद्धा सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)