रवी दामोदर,अकोला :आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी माथा टेकण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय म्हणून मध्य रेल्वेने नवी अमरावती ते पंढरपूर व नागपूर ते मीरज या दोन स्थानकांदरम्यान १३ ते २० जुलै या कालावधीत चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या अप व डाउन अशा आठ फेऱ्या होणार असून, त्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकर भाविकांची सोय होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग प्रबंधक कार्यालयातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०१११९ न्यू अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वे १३ व १६ जुलै रोजी दुपारी १४:४० वाजता प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १६:२० वाजता अकोला स्थानकावर येऊन १६:३० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ९:१० वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०११२० पंढरपूर-न्यू अमरावती विशेष रेल्वे १४ व १७ जुलै रोजी सायंकाळी १९:३० वाजता रवाना होणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०७ वाजता अकोला स्थानकावर येऊन १०:१० पुढील प्रवासासाठी रवाना होऊन दुपारी १२:४० वाजता न्यू अमरावती स्थानकावर पोहोचणार आहे.या स्थानकांवर थांबणार गाड्या-
या दोन्ही गाड्यांना अप व डाउन या दोन्ही बाजूंनी बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा असणार आहे.