अकोला: तक्रारदाराच्या लम्पी आजाराने मृत्यू पावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मंजूर करून ३२ हजार रूपये लाभ मिळवून दिल्याचा मोबदला पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रविण नारायण राठोड यांनी खासगी व्यक्तीमार्फत ८ हजार रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी उशिरा रात्री कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तक्रारदाराने १५ जून रोजी दिलेल्या तक्रारीनुसार लम्पी आजाराने मृत्यू पावलेल्या जनावरांची नुकसानभरपाई मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज केला होता. त्यानुसार त्याला भरपाई मंजूर करून ३२ हजार रूपयांचा लाभ देण्यात आला. लाभ दिल्याचा मोबदला म्हणून पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रविण नारायण राठोड (नेमणुक जिल्हा पशु वैद्यकिय सर्व चिकीत्सालय अकोला) यांनी १० हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार व त्यांच्यात झालेल्या तडजोडीअंती ८ हजार रूपये देण्याचे ठरले. परंतु तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने, त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे तक्रार केली.
एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या अधिकाऱ्यांनी संत तुकाराम चौकात मयुर कॉलनीत असलेल्या तक्रारदाराच्या गोशाळेत सापळा रचला. याठिकाणी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रविण राठोड यांच्यावतीने आरोपी राजीव शंकरराव खाडे रा. अकोला यांने ८ हजाराची लाच स्विकारली. लाच स्विकारताच, एसीबी अधिकाऱ्यांनी खाडे याला रंगेहात पकडले. प्रविण राठोड यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आले असुन खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.