अकोला : जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत असली, तरी दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्हाभरात ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली, तर २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने दिलासा मिळाला आहे.
शासकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या ३२२ आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यामध्ये २५ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. उर्वरित २९७ रुग्ण निगेटिव्ह असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये १४, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये १३ अशा एकूण ५२ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्हाभरात नोंदणी झाली आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांपैकी २२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे.
२३२ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ६४,९८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ६३,५९० जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर १,१६४ जण मृत्युमुखी पडले आहेत. सद्यस्थितीत २३२ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.