अकोला : तु दिसायला सुंदर नाही...मला शोभत नाही. तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही. त्यामुळे आता ऑटो घेण्यासाठी वडिलांकडून १ लाख रूपये आण. असा तगादा लावून २६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून पतीने दुसऱ्या युवतीसोबत संसार थाटून फसवणूक केल्याप्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पतीसह सासरच्या चार लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला. अकोल्यातील गुलजारपुऱ्यात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील संभाजी नगरात राहणाऱ्या चेतन प्रकाश फूलारी याच्यासोबत २०१९ मध्ये लग्न झाले.
वडिलांनी चार लाख रूपये लग्नात खर्च केला. काही महिने सुरळीत गेल्यानंतर पती चेतन फुलारी, सासरे प्रकाश सदाशिवराव फुलारी, नणंद आरती अजय राउत उर्फ मचपते, नंदोई अजय अजाबराव राउत उर्फ मचपते यांनी वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही. यावरून त्रास द्यायचे. तसेच माहेराहून मालवाहू ऑटोसाठी १ लाख आणण्यासाठी तगादा लावत होते. तसेच तु आम्हाला शोभत नाही व तु दिसायला सुंदर नाही असे हिणवून घरातून हाकलून दिले. विवाहितेला मुलगा झाल्यानंतरही पती व सासरचे लोक बघायला आले नाहीत. त्यानंतर अनेकवेळा विवाहिता सासरी नांदण्यासाठी गेली. परंतु पती व सासरकडून छळ होत असल्याने, विवाहिता माहेरी आली. दरम्यान पती चेतन फुलारी याने एका मुलीशी विवाह केला. पहिली पत्नी असताना, दुसरा विवाह करून पती फसवणूक केली व शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणात पोलिसांनी पतीसह चौघांविरूद्ध भादंवि कलम ३२३, ४९८(अ), ४९४, ५०६, ५०४(३४) नुसार गुन्हा दाखल केला.