अकोला : विवाहितेचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करून तिला माहेराहून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा पती व सासू लावायचे. त्यामुळे विवाहितेच्या वडिलांनी ५० हजार रुपये दिले. त्यानंतरही पती व सासूने छळ करणे थांबविले नाही. मानसिक त्रास असह्य झाल्याने, ६ ऑगस्ट रोजी विवाहितेने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. याप्रकरणात अकोट शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील सविता मधुकर चौरपगार (४५) यांच्या तक्रारीनुसार त्यांना एक मुलगा व दोन मुली असून, त्यापैकी शीतल हिचा विवाह मार्च २०२० मध्ये अकोटातील नंदीपेठ येथील अजय हरिदास इंगोले याच्यासोबत झाला.
पती व सासूने कोरोनात लग्न झाले. माहेरच्यांनी काही हुंडा दिला नाही. त्यामुळे वडिलांकडून पैसे घेऊन येण्याचा तगादा लावत आणि शिवीगाळ करून मारझोड करीत. त्यानंतरही शीतलने कसेबसे दिवस काढले. एक दिवस परिस्थिती बदलेल. या विचाराने ती संसार करीत राहिली. अशातच तिला मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर एक वर्ष सुरळीत गेले. त्यानंतर पुन्हा पती अजय इंगोले, सासू प्रतिभा इंगोले, दीर अमर इंगोले हे सातत्याने छळ करायचे आणि वडिलांकडून पैसे आणण्यासाठी भांडण करायचे. त्यानंतर जावई अजय इंगोले याला घराच्या बांधकामासाठी शीतलच्या वडिलांनी ५० हजार रुपये दिले. त्यानंतरही आरोपी तिचा सातत्याने छळ करून तिला शिवीगाळ, मारहाण करायचे. आरोपींच्या दररोजच्या छळाला कंटाळून ६ ऑगस्ट रोजी विवाहिता शीतल अजय इंगोले हिने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
मुलीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर घेतला निर्णय
शीतल इंगोले ही ५ ऑगस्टपूर्वी माहेरी सामदा येथे होती. त्यामुळे दिराने व सासूने मुलीचा वाढदिवस करायचा असल्याने, घरी यायचे नाही का? अशी विचारणा केली. त्यामुळे शीतल ही मुलीला घेऊन सासरी गेली. ५ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी मुलगी अनुश्री हिचा वाढदिवस साजरा केला. ६ ऑगस्ट रोजी सासरच्या लोकांनी भांडण करीत असल्याचा फोन शीतलने तिचा भाऊ मंगेश याला केला होता. त्यानंतर शीतलने गळफास घेतल्याचे आरोपी अजय इंगोले याने फोन करून सांगितले होते.