अकोला : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे उन्हाची दाहकता कमी होऊन ४० अंशापर्यंत घसरलेला पारा गत दोन दिवसांपासून पुन्हा वरच्या दिशेने सरकत आहे. जून महिना सुरू झाल्यानंतरही उन्हाचे चटके जाणवत असून, शनिवार, ४ जून रोजी जिल्ह्याचे तापमान ४४.२ अंश नोंदविल्या गेले. तापमानात शुक्रवारच्या तुलनेत ०.६ अंशांची वाढ झाली.यावर्षी मार्च महिन्यापासूनच ४० अंशाच्यावर चढलेला पारा एप्रिल व मे महिन्यात ४५ अंश सेल्सिअसला गवसणी घालून आला. मे महिन्यात शेवटचे काही दिवस सूर्य आग ओकून तापमानाचे सर्व विक्रम मोडित काढेल अशी अपेक्षा असताना अवकाळी पाऊस झाल्याने पारा ४० अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे अकोलेकरांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला होता. वातावरणातील हा सुखद बदल काही दिवसच कायम राहिला. गत दोन दिवसांपासून सूर्य पुन्हा तीव्रतेने तळपत असून, उन्हाची दाहकता वाढली आहे. शनिवारी दुपारी तर अक्षरश: चटके जाणवत होते. उकाड्यामुळे अकोलेकर त्रस्त झाले आहेत.
जून महिन्यातही उन्हाचे चटके, पारा ४४.२ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2022 10:52 AM