अकोला : यंदा जिल्ह्यात तब्बल २८ टक्के पावसाची तूट असून, परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामात आतापर्यंत केवळ ३८ टक्केच पेरणी आटोपली आहे. जमिनीत ओलावा कमी असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. रब्बीत सार्वाधिक हरभरा पिकाची पेरणी झाली असून, गहू पिकासह इतर पिकांचे क्षेत्र घटले आहे. त्यात आता परतीच्या पावसाचा अंदाजही दिसून येत नसल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम देवाच्याच भरवशावर असल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात सरासरी १.२१ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी अपेक्षित असते. गत दोन वर्षांमध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढून १.५० लाख हेक्टरपर्यंत पोहोचले होते. यंदाही कृषी विभागामार्फत १.५४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी क्षेत्र अपेक्षित होते. मात्र, पावसाने दडी दिल्याने पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. खारपाणपट्ट्यात हरभऱ्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, यंदा परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले नसल्याचे चित्र आहे. सोयाबीन सोंगणी आटोपल्यानंतर जमिनीत ओलावा कमी असल्याने यंदा रब्बीच्या पेरणीवर परिणाम झाला. सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी गहू पिकाकडे पाठ केल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट होत आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार दि.२२ नोव्हेंबरपर्यंत ४६ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.
हरभऱ्याची पेरणीही केवळ ३६ टक्के
खारपाणपट्ट्यात कोरवाहू शेतीत हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, यंदा जमिनीत ओलावा कमी असल्याने अशा शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात प्रचंड घट झाली आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ३०९ हेक्टर अपेक्षित असताना, केवळ ३६,०८६ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली आहे. हे प्रमाण केवळ ३६ टक्के आहे.