अकोला: ग्राम बाल संरक्षण समितीच्या जागरूकतेमुळे तेल्हारा तालुक्यातील एका गावात होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात यश आले. तेल्हारा तालुक्यातील सौंदळा गावामध्ये दि. १६ मे रोजी बालविवाह असल्याची माहिती ग्राम बाल संरक्षण समितीला मिळाली होती. त्यानुसार ग्राम बाल संरक्षण समिती व हिवरखेडचे पोलिस निरीक्षक, तसेच संबंधित गावातील कर्मचाऱ्यांनी विवाहस्थळी भेट दिली. मुलीच्या जन्मतारखेची पडताळणी केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. यावेळी दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन बालविवाह प्रतिबंधक अधिनियमबाबत माहिती दिली.
अठरा वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न करणार नसल्याचे हमीपत्र दोन्ही कुटुंबियांकडून लिहुन घेण्यात आले आहे. बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबतही माहिती देण्यात आली. बालविवाह ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून बालविवाहाला प्रतिबंधासाठी जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावपातळीवर कार्यरत ग्राम बाल संरक्षण समितीमार्फत माहिती मिळाल्यास तत्काळ दखल घेउन बालविवाह थांबवणे शक्य होते.जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी सुजाण नागरिक व संघटनांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.