अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गत आठवड्यात एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गुरुवारी डीएमईआर नागपूर येथील चार दसस्यीय समिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली. यावेळी समितीने अधिष्ठाता यांच्यासह बालरोग विभागप्रमुखांची चौकशी केल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २२ च्या स्वच्छतागृहात एका महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे महिलेने आत्महत्या केल्याच्या दोन दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आल्याने येथील कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला. दरम्यान आमदार रणधीर सावरकर यांनी या घटनेचा मुद्दा विधिमंडळात मांडला.
त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला याविषयी विचारणा झाली. त्यावर उत्तर देत बालरोग विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टरांना यासाठी जबाबदार ठरत त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव अधिष्ठाता यांनी वरिष्ठांकडे पाठविला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने नागपूर येथील सहसंचालक डाॅ. फुल पाटील, डॉ. वायकर, डॉ. महाकालकर, डाॅ. संजय राठोड या चार जणांची समिती गठीत केली. या समितीने गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन अधिष्ठाता आणि संबंधित विभाग प्रमुख यांची चौकशी केली. चौकशी अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.