संतोष येलकर, अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थांतर्गत एपीएल शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी दरमहा प्रतिव्यक्ती १५० रुपये अनुदान दिले जात असले, तरी गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत या आठ महिन्यांच्या अनुदानाची रक्कम जिल्ह्यातील १ लाख ५० हजार ४२७ एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांतील थकीत अनुदानाची रक्कम शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने डिसेंबर, २०२२ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, एपीएल शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी दरमहा प्रतिव्यक्ती १५० रुपये अनुदानाची रक्कम दिली जात आहे. त्यानुसार, जिल्ह्यात एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक ३८ हजार ५८९ कुटुंबांतील १ लाख ५० हजार ४२७ लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा १५० रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये गेल्या जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत तीन महिन्यांतील अनुदानाची रक्कम १ लाख ४२ शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली, परंतु त्यानंतर गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत या आठ महिन्यांच्या कालावधीतील अनुदानाची रक्कम जिल्ह्यातील १ लाख ५० हजार ४२७ एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना अद्याप मिळाली नसल्याचे चित्र आहे.
‘या’ आठ महिन्यांतील अनुदानाची रक्कम थकीत!
जिल्ह्यातील एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही. थकीत अनुदानाची रक्कम शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणे बाकी आहे.
तीन महिन्यांचे मिळाले अनुदान!
जिल्ह्यात एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थ्यांची संख्या १ लाच ५० हजार ४२७ असून, त्यापैकी १ लाख ४२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात गेल्या जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांच्या अनुदानाची रक्कम गेल्या ऑक्टोबर अखेरपर्यंत जमा करण्यात आली. त्यानंतर, एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांतील अनुदानाची रक्कम मात्र थकीत आहे.