अकोला : दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांची उलंगवाडी झाल्याने तापत्या उन्हाच्या दिवसांत शेतीची कामे नसल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मजुरांच्या हाताला कामांची मागणी वाढली आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुरू असलेल्या १ हजार ७२० कामांवर १० हजार ३५ मजुरांची उपस्थिती असल्याचे वास्तव आहे.
गेल्या पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे गेल्या ऑगस्टमध्येच शासन निर्णयानुसार जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. शेतातील कोरडवाहू पिकांची दोन महिन्यांपूर्वीच उलंगवाडी झाल्याने, शेतीची कामेही थांबली आहेत. त्यामुळे तापत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी मजुरांकडून होणाऱ्या मागणीत वाढ झाली असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विविध भागांत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांना रोजगाराचा आधार मिळाला आहे.
१,७२० कामांवर १०,०३५ मजूर !तालुका कामे मजूर उपस्थितीअकोला ३९४ २९३६अकोट २५९ १०२०बाळापूर १७८ ७९३बार्शिटाकळी २५० १६२८मूर्तिजापूर २८५ १७०८पातूर २१६ १३८३तेल्हारा १३८ ५६७
महिनाभरात ६,८३५ मजुरांची वाढली उपस्थिती !जिल्ह्यातील रोहयो कामांवर गेल्या ८ एप्रिलपर्यत ३ हजार २०० मजुरांची उपस्थिती होती. त्यानंतर ३ मे पर्यंत जिल्ह्यातील रोहयो कामांवरील मजुरांची उपस्थिती १० हजार ३५ इतकी झाल्याने, महिनाभरात ६ हजार ८३५ मजुरांची उपस्थिती वाढल्याचे चित्र आहे.
अशी आहेत सुरू कामे!रोहयोअंतर्गत जिल्ह्यात सध्या घरकुल, सिंचन विहिरी, पाणंद रस्ते, गुरांचे गोठे, रोपवाटिका, वृक्ष संगोपन आदी कामे सुरू आहेत.
मागणी येताच कामे उपलब्ध करून द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश !रोहयोअंतर्गत जिल्ह्यात गावपातळीवर मजुरांकडून कामांची मागणी प्राप्त होताच तातडीने कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील तहसीलदार व पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना २ मे रोजी आढावा बैठकीत दिले. तालुकास्तरावरील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन रोहयो कामांची गती वाढविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.