- अतुल जयस्वाल
अकाेला : महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावत राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे व भाजप सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रीमंडळ विस्तार अखेर मंगळवारी करण्यात आला. या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेतलेल्या १८ आमदारांमध्ये विदर्भातील दोघांचा समावेश असला, तरी अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांच्या अर्थात पश्चिम वऱ्हाडाच्या पदरी उपेक्षाच आल्याने नाराजीचा सुर उमटत आहे.
अकाेला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये १५ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी ९ मतदारसंघ भाजपाकडे असून शिंदे गटासाेबत जाणारे शिवसेनेचे दाेन आमदार असे ११ पर्याय सत्तापक्षाकडे आहेत. अकाेला जिल्हा हा शतप्रतिशत भाजपामय करण्याचे काम येथील नेत्यांनी केले आहे. त्यामुळे यावेळी अकाेल्याला संधी मिळेलच अशी आशा कार्यकर्त्यांना होती. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार रणधीर सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. सलग दाेन वेळा निवडून आलेले आ. सावरकर यांची खा. संजय धाेत्रे यांच्या तालमीत पक्ष संघटनेवर पकड असून अभ्यासू आमदार अशी ओळख निर्माण केली आहे. ज्येष्ठतेमध्ये आ. गाेवर्धन शर्मा व आमदार प्रकाश भारसाकळे यांचाही पर्याय पक्षापुढे होता. वाशिममध्ये आमदार राजेंद्र पाटणी हे मंत्रिपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी पक्षपातळीवर सरस ठरली असल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना मंत्रिपदाची ताकद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती
विदर्भात बुलडाणा जिल्ह्याने शिंदे गटाला सर्वाधिक ताकद दिली आहे. आ.डाॅ. संजय रायमूलकर, आ. संजय गायकवाड या सेनेच्या दाेन्ही आमदारांनी पहिल्या दिवसापासून शिंदेंना समर्थन दिले आहे, तर खासदार प्रतापराव जाधव यांनीही शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. शिवसेेनेत डाॅ. रायमूलकर हे सर्वांत ज्येष्ठ आमदार असून गेल्या सरकारमध्ये ते पंचायतराज समितीचे अध्यक्ष हाेते. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांचे पारडे जड आहे. दुसरीकडे भाजपाचे माजी मंत्री डाॅ. संजय कुटे हे सेनेतील बंडाचे साक्षीदार राहिले आहेत. ते सुरतमध्ये ठाण मांडून बसले हाेते. त्यामुळे बुलडाण्यात त्यांच्यासह दाेन मंत्रिपदे मिळतीलच, असा दावा दाेन्ही पक्षांकडून केला जात होते. परंतु ही अपेक्षा फोल ठरल्याचे मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात दिसून आले.