अकोला : अकोल्यातील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे उद्घाटन खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते हेड पोस्ट आॅफिसमध्ये शनिवारी झाले. खा. धोत्रे यांचे बायोमेट्रिक थम्बद्वारे पहिले बँक खाते उघडून हे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खासदार धोत्रे लोणी येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. दरम्यान, पोस्ट बँकेचा जाहीर लोकार्पण सोहळा प्रमिलाताई ओक सभागृहात थाटात पार पडला. याप्रसंगी अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर, अकोला महापालिकेचे महापौर विजय अग्रवाल, पोस्ट विभागाचे अकोल्याचे प्रमुख व्ही. के. सिंग, आर. एन. कुळकर्णी, यू. के. मानकर, अल्तमत हुसेन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.पोस्ट खात्याने देशभरातील खेड्यापाड्यात निष्ठेने सेवा प्रदान करून विश्वासार्हता जोपासली आहे. त्याचा उपयोग पोस्ट बँकेच्या सेवेत निश्चितच होईल, असे प्रतिपादन येथे आमदार रणधीर सावरकर यांनी केले. अकोला महापालिकेचे महापौर विजय अग्रवाल यांनीदेखील येथे मार्गदर्शनपर भाषण केले. आपण खूप विकास केला; मात्र विश्वास जिंकू शकलो नाही, तर विकास काही कामाचा नाही. पोस्ट खात्याने मात्र विश्वासाची परंपरा जोपासली आहे. पोस्टाचे बँकेत रूपांतर होत असताना सरकारने इंटरनेट सुविधा आणि साहित्यदेखील अद्ययावत पुरवावे, असे मत अग्रवाल यांनी येथे व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर, लगेच दिल्ली येथील उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रसारण सभागृहात दाखविण्यात आले.कार्यक्रमाला पोस्ट खात्याचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते.