अकोट : शहरातील स्थानिक प्रभाग क्र. १४ मधील नंदीपेठ भागातील मराठी शाळा क्रमांक ४ च्या आवारभिंतीचे ५ जुलै रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी भाजप शहराध्यक्ष कनक कोटक होते. उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, पाणीपुरवठा सभापती मंगेश चिखले, सागर बोरोडे, प्रथमेश बोरोडे, मुख्याध्यापक तरोळे, चोपडे, शिक्षक नाथे, पिंजरकर, राजेश हाडोळे, हरिदास हाडोळे आदी उपस्थित होते.
आदिवासी पुनर्वसित अमोना गावात वृक्षदिंडी
बोर्डी : आदिवासी पुनर्वसित अमोना गावात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत अंगारमुक्त जंगल या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेंतर्गत वृक्षदिंडी, वृक्षवाटप, वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. गावातून ग्रामस्थांनी वृक्षदिंडी काढली. यात वनपाल जाधव, वनरक्षक हिंमत खांडवाय, दिनेश मात्रे, जानराव मोहोड, ग्रामसेवक नागोराव सोलकर, मदन बेलसरे आदी उपस्थित होते.
चिंचोली-वाडेगाव मार्गावर दारू जप्त
बाळापूर : चिंचोली-वाडेगावदरम्यान एकास पकडून दारूबंदी कायद्यांतर्गत कलम ६५ नुसार कारवाई केली. पीएसआय मनोज वासाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईमध्ये दिनेश देवालाल डाबेराव, रा. बेलुरा याच्याकडून ९६ बाटल्या जप्त केले. या दारूची किंमत ३ हजार ६०० रुपये आहे.
मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल
हिवरखेड : हिवरखेड पोलीस स्टेशनअंतर्गत एदलापूर येथे चारवर्षीय मुलीला पैशांचे आमिष दाखवून विनयभंग करणा-या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.
तेल्हारा येथील अडते, व्यापा-यांचा बंद
तेल्हारा : केंद्र शासनाने लावलेल्या स्टॉक लिमिटविरोधात तेल्हारा येथील सर्व अडते व व्यापारी यांच्याकडून मार्केट यार्ड बाजार बंद करण्याबाबत कृषी बाजार समितीचे सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांना पत्र दिले असून, पुढील सूचनेपर्यंत अडते, व्यापारी यांनी कृषी माल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली आहे.
मोरगाव परिसरात दुबार पेरणीचे संकट
बार्शीटाकळी : मोरगाव काकड परिसरातील शेतक-यांनी महागडे बियाणे, खते खरेदी शेतात पेरणी केली. परंतु, गत काही दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतातील पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
दहिगाव येथे लसीकरणास प्रतिसाद
तेल्हारा : शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू केले आहे. दहिगाव अवताडे येथे ५ जुलै रोजी झालेल्या लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील युवकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
हिवरखेड येथे दोन गटांत हाणामारी
हिवरखेड : नाल्यातून रेतीची वाहतूक करण्याच्या वादातून गावातील दोन गटांत हाणामारी झाल्याची माहिती आहे. परंतु, पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. यापूर्वीसुद्धा रेतीच्या वाहतुकीतून दोन गटांत वाद होऊन हाणामारीची घटना घडली होती. त्यावेळीसुद्धा पोलिसांनी कारवाई केली नाही.