अकोला: शहरात संसर्गजन्य कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहर कंटेन्मेंट झोन घोषित केले आहे. संसर्ग टाळण्यासाठी आता नागरिकांनीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, दुपारी तीन नंतरही व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरु ठेवणाऱ्या दहा जणांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली.
घराबाहेर निघताना तोंडाला मास्क न लावणे, आपसात चर्चा करताना किमान चार फुटांचे अंतर राखून संवाद न साधणे तसेच बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी निघणाऱ्या अकोलेकरांना सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा विसर पडल्यामुळे की काय, मागील काही दिवसांपासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. परिस्थिती लक्षात घेता विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच महापालिका आयुक्त निमा अरोरा यांनी कोरोनाच्या नियमावलीचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व जिल्हा सामान्य रुग्णालय असो वा खासगी कोविड सेंटरमध्ये उपलब्ध खाटांची कमतरता ध्यानात घेता प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन करण्यास कुचराई केली जात असल्याचे पाहून मनपा प्रशासनाने संपूर्ण महापालिका क्षेत्र कंटेन्मेंट झोन घोषित केले आहे.
दुपारी ३ नंतर व्यवसाय नाहीच!
मनपा क्षेत्रामध्ये कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता संपूर्ण शहर कंटेन्मेंट घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा वगळल्यास दुपारी ३ नंतर व्यवसाय करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
काला चबुतरा भागात कारवाई
शहराच्या मध्यभागातील काला चबुतरा येथील इंदौर गल्ली मध्ये एकूण नऊ व जठारपेठ भागात एका व्यावसायिकाने दुकान उघडली ठेवली होती. त्या अनुषंगाने मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने संबंधीतांवर प्रत्येकी पाच हजार रूपयांची दंडातमक कारवाई करण्यात आली.
अकोलेकरांनो गांभीर्य ओळखा!
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून प्रत्येक घरामध्ये कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून येत आहे. एका व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबीयांचा जीव धोक्यात येत असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दवाखान्यात भरती करताना कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अकोलेकरांनी गांभीर्य ओळखून जबाबदारीने वागण्याची गरज निर्माण झाली आहे.