गावरान आंब्याची बाजारात मागणी
अकोला : शहरातील विविध भागांत सध्या गावरान आंबे विक्रीसाठी आले आहेत. बैलगाडीत रचलेले आंब्यांचे ढीग ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. ६० रुपयांपासून ते १०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे आंब्याची विक्री होत आहे. अनेक विक्रेते जिल्ह्याबाहेरून तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून शहरात विक्रीसाठी दाखल होत आहेत.
रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याला बत्ती
अकोला : शहरातील केशवनगर, माधवनगर, खडकी, कौलखेड परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच कचरा पेटवून दिला जात असल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. याशिवाय सध्या वारा उधाणाचे दिवस असल्याने आगीसारख्या घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे कचरा पेटविणाऱ्यांवर वचक बसविण्याची गरज व्यक्त होत आहे.
बागांमध्ये ‘नो मास्क नो डिस्टन्स’
अकोला : शहरातील बागबगिचे आणि मोकळ्या जागांमध्ये सकाळ-सायंकाळ फिरणाऱ्यांची वर्दळ वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षात्मक खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक जण विनामास्क व सुरक्षित अंतर न राखताच फिरत असल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.