पातूर : जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेकरिता टंचाईग्रस्त गावांचा समावेश करण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या शिर्ला गावाची लोकसंख्या १३०००, तसेच भंडाराज बु. गावाची लोकसंख्या ४७०० असून, पिण्याच्या पाण्याची शाश्वत योजना अस्तित्वात नसल्यामुळे केवळ हात पंपावर या गावांना पाण्यासाठी विसंबून राहावे लागते. उन्हाळ्यात पाणीटंचाईदरम्यान दोन ते पाच किलोमीटर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागते. त्यामुळे सदर गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेतून विहीर, पाण्याची टाकी,पाईपलाईन, स्टँड पोस्ट आदींचा कृती आराखड्यात समावेश करण्याची मागणी आ. नितीन देशमुख यांनी पत्राद्वारे केली आहे. शिर्ला पंचायत समिती गणाचे सदस्य, पातूर पंचायत समितीचे गटनेते अजय ढोणे यांनी सातत्याने या प्रकरणी पाठपुरावा केला होता.