शाळा, महाविद्यालय एक वर्षाहून अधिक काळ बंद आहेत, परीक्षा रद्द झाल्या आहेत, परीक्षा न घेता मुलांना पुढील वर्गात बढती दिली गेली आहे. सरकार ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे पण त्याचे निकाल खूप निराशाजनक आहेत. महागडे मोबाइल, इंटरनेट कनेक्शन, पुस्तके व स्टेशनरी नसल्यामुळे मुलांना शिक्षणामध्ये रस निर्माण होत नाही. जोपर्यंत पुस्तके, नोटबुक, पेन मुलांच्या हातात येत नाहीत तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा काही अर्थ नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार शिक्षणाशी संबंधित सर्व साहित्य अत्यावश्यक सेवेत येत नाही आणि यामुळे पुस्तके व स्टेशनरी व्यापारी आपली दुकाने उघडू शकत नाहीत हे अन्यायकारक असल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुस्तक व स्टेशनरी व्यावसायिकांना कमी कालावधीत आपली दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने आलोक खंडेलवाल, दीपक लाठिया, दीपेश जालोरी, पंकज वैखरिया व अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
अत्यावश्यक सेवेमध्ये पुस्तक विक्रीचा समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:18 AM