केंद्र शासनाने २०२१-२२ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यामध्ये मंजूर न केलेली आरोग्य सेविकांची ५९७ पदे ३१ ऑगस्टपूर्वी रद्द करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ११ कंत्राटी आरोग्यसेविकांची पदे रद्द करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहेत. कोविड काळात सर्व्हेचे महत्त्वाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यरत एनआरएचएम कर्मचाऱ्यांकडून कोविड-१९ चे काम करून घेतले जात आहे. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव व पुढे नवदुर्गा असल्याने मोठ्या प्रमाणावर कोविड टेस्टिंग, नियमित सर्वेक्षण यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
आरोग्य कार्यक्रमांवर परिणाम होण्याची शक्यता
जिल्ह्यात कार्यरत ७० आरोग्यसेविका या नियमित लसीकरण, कोविड संदिग्धांचा नमुना घेणे, कोविड सर्व्हे, लसीकरण, सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी इत्यादी कामे सांभाळत आहेत. या परिस्थितीत ११ पदे कार्यमुक्त केली तर त्याचा परिणाम आरोग्य कार्यक्रमांवर होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.